‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

साईश्री कोळीची आंतरराष्ट्रीय भरारी; कोळी समाजात आनंदाची लाट

| उरण | प्रतिनिधी |

मुंबईच्या किनारपट्टीवर मासेमारीचा वारसा जपणाऱ्या कोळी समाजातून आता ज्ञानाच्या सागरातही भरारी घेतली जात असल्याचे अभिमानास्पद उदाहरण समोर आले आहे. उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथील साईश्री किरण कोळी हिने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत थेट जर्मनीतील प्रतिष्ठित ‌‘युनिव्हर्सिटी ऑफ रोस्टॉक’मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण कोळी समाजात आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे.

साईश्रीने ‌‘इंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटी’मधून ‌‘नेव्हल आर्किटेक्चर अँड ओशन इंजिनिअरिंग’ या विषयात बी.टेक. पदवी संपादन केली आहे. समुद्राशी नाळ जुळलेल्या कोळी समाजातील मुलीने सागरी अभियांत्रिकीसारख्या कठीण क्षेत्रात यश संपादन करून आता जर्मनीत ‌‘एम.एस्सी. इन सस्टेनेबल मॅरिटाइम इंजिनिअरिंग’ या अभ्यासक्रमासाठी निवड मिळवली आहे.

‌‘समर सेमिस्टर 2026’साठी ‌‘युनिव्हर्सिटी ऑफ रोस्टॉक’ने तिला अधिकृत प्रवेश दिला असून, तिच्या गुणवत्तेची दखल घेत जर्मन शैक्षणिक प्रणालीप्रमाणे 1.5 (Equivalent Grade) ही उच्च श्रेणी प्रदान केली आहे. जर्मनीच्या शिक्षण पद्धतीत हा दर्जा अत्यंत उल्लेखनीय मानला जातो. साईश्रीचे हे यश तिचे वडील किरण कोळी यांच्या मार्गदर्शनासह तिच्या अथक परिश्रम, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीचे फलित मानले जात आहे. साध्या कोळी कुटुंबातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठापर्यंत पोहोचलेली ही झेप अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

साईश्रीला जर्मनीत प्रवेश मिळाल्याची बातमी समजताच मोरा कोळीवाडा तसेच उरण तालुक्यातील कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नेते आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक करत तिला ‌‘दर्याची लेक’ म्हणून गौरविले आहे.
‌‘साईश्रीचे यश हे केवळ एका मुलीचे नाही, तर संपूर्ण कोळी समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. तिच्या यशामुळे समाजातील इतर मुलींनाही मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल,’ अशा भावना समाजातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

दोन वर्षांच्या या पदव्युत्तर शिक्षणानंतर साईश्री सागरी अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक ज्ञान घेऊन भारतात परतल्यास देशाच्या सागरी उद्योगात आणि किनारपट्टीच्या विकासात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. साईश्री कोळीच्या या यशस्वी झेपेबद्दल संपूर्ण कोळी समाजाकडून तिचे आणि किरण कोळी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, तिचा पुढील प्रवास यशस्वी आणि उज्ज्वल होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे

Exit mobile version