साफसफाई करीत जेएनपीएचा निषेध
अद्यापही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत
। उरण । वार्ताहर ।
गेली चार दशके पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा आता संयम सुटत चालला आहे. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही तोपर्यंत जेएनपीएच्या विरोधात सुरु केलेले आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी हजारो ग्रामस्थांनी शेवा कोळीवाडा येथे ग्रामस्वच्छता आंदोलन करुन जेएनपीएच्या विरोधात गांधीगिरी आंदोलन केले.
हा साफसफाईचा कार्यक्रम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सुरूच ठेवणार असून ग्रामस्थ जुना शेवा कोळीवाडा गावात ठाण मांडून बसणार आहेत. हनुमान कोळीवाडा गावातील पारंपारीक मच्छिमारांना सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्यामुळे मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याने मूळ शेवा कोळीवाडा गावात ग्रामस्थ स्वखर्चाने हक्काची घरे बांधून कायमचे शेवा कोळीवाड्यात राहणार आहेत.असे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी रमेश कोळी, सुरेश कोळी, परमानंद कोळी, नितीन कोळी, हरेश कोळी, मेघनाथ कोळी, मंगेश कोळी, नम्रता कोळी, दीप्ती कोळी, कल्याणी कोळी, ज्योती शेवेकर, उज्वला कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 5 पीआय,12 एपीआय, 125 पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. जेएनपीटीने फंड न दिल्याने गेली 37 वर्ष होऊनही ते पूर्ण झालेले नाही. सरकारने संक्रमण शिबीर तयार करून गुरांच्या कोंडवाड्याप्रमाणे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना ठेवलेले असून त्याठिकाणी घरांना लागलेल्या वाळविनेही ग्रामस्थांना सोडले नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशी तक्रार रमेश कोळी या ग्रामस्थाने केली आहे.
ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून असंतोष खदखदत आहे याच पाश्वर्र्भूमीवर ग्रामस्थांनी हनुमान कोळीवाड्याच्या गावठाणाच्या जागेवर जाऊन घरांची उभारणी आणि गावाची साफसफाई करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – मंगेश कोळी, ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता अबाधित राहावी. कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. – धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोर्ट विभाग.