निकिता दरेकरला कांस्यपदक
| पणजी | वृत्तसंस्था |
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या नौकानयनच्या कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महाराष्ट्राचा नौकानयनपटू दत्तू भोकनळचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याने रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःचे दुसरे रौप्यपदक नोंदवले. महिलांमध्ये पुण्याची खेळाडू निकिता दरेकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नौकानयनमध्ये सोमवारी महाराष्ट्राने एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके पटकावली.
कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत खेळाडूंना धावत जाऊन वजनाने जाड असलेल्या बोटीमध्ये बसत समुद्रात 500 मीटर नौकानयन करायचे असते. ही शर्यत दत्तूने 2 मिनिटे, 33.6 सेकंदांत पार केली, तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या सेनादलाच्या सलमान खानने हे अंतर 2 मिनिटे, 33.5 सेकंदांत पार केले. दत्तूने याआधी या स्पर्धेतील नदीत झालेल्या सिंगल्स स्कल विभागात रौप्यपदक मिळवले होते. आतापर्यंत त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात 11 सुवर्ण व 2 रौप्य अशी 13 पदके जिंकली आहेत.
कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महिलांच्या विभागात निकिताने कांस्यपदक मिळवताना 3 मिनिटे, 6.8 सेकंद वेळ नोंदवली. दीड महिन्यापूर्वी तिच्या गुडघ्यातील स्नायूंना दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही, तरीही तिने या स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची नोंद केली. गतवर्षी तिने श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच इनडोअर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले होते. ती सुरुवातीला कबड्डी खेळत असे. चार वर्षांपूर्वी तिने नौकानयनचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती पुण्यात सीएमई येथे सराव करीत असून, ओम साई फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेत वाणिज्य शाखेत शिकत आहे.