दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा होणार लिलाव

5 जानेवारीला ई-ऑक्शन स्वरूपात पार पडणार प्रक्रिया

| मुंबई | वृत्तसंस्था |

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबई पाठोपाठ रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. हा लिलाव 5 जानेवारीला होणार असल्याची माहिती सुरभी शर्मा यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मुंबके येथील 4 शेत जमिनीचा लिलाव तसेच बंगल्याचा त्यामध्ये समावेश आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा लिलाव ई-ऑक्शन स्वरूपात होणार आहे. स्मगलर आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटरमार्फत दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. ड्रग्ज प्रकरणात महसूल विभागाने दाऊदची संपत्ती जप्त केली होती. याआधीही सेफेमाने दाऊदच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव केला होता. दाऊदच्या 11 मालमत्तेचा पहिल्यांदा 2000 मध्ये आयकर विभागाने लिलाव केला होता. मात्र, त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीही आले नव्हते. गेल्या काही वर्षांत दाऊदच्या अनेक मालमत्ता विकून त्याचा ताबा खरेदीदारांना मिळवून देण्यात तपास यंत्रणांना योग्य ते यश आले होते.

2018 मध्ये नागपाडा येथील एक हॉटेल, एक गेस्ट हाऊस आणि दाऊदची एक इमारत विकण्यात आली होती. त्याचवेळी दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यात तपास यंत्रणेला यश आले. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील 1.10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा रत्नागिरीमध्ये लिलाव करण्यात आला होता. या लिलावात दोन भूखंड आणि एक बंद पेट्रोल पंप यांचा समावेश होता. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या नावावर खेड तालुक्यातील लोटे गावात या मालमत्तांची नोंद करण्यात आली होती.

Exit mobile version