दिवस प्रेमाचा, मानव जातीचा!

मोहिनी गोरे
प्रेम म्हणजे प्रेमच असतं; प्रत्येकाचेच प्रेम असते,
आपल्या माणसांवर देशांवर आणि मूल्यांवर,
गरीबीत एक भाकरी दोघांनी खाण्यात प्रेम असते,
 मूनलाईट कॅण्डल डिनरमध्येही प्रेमच असते,
साम्राज्यवादात पारतंत्र्यात ही प्रेम केले आम्ही,
पारतंत्र्याचे साखळदंड तुटल्याचा आवाज ऐकला आम्ही,
खुलेआम प्रेम करण्याचा अधिकार दिलाय संविधानाने,
प्रेम करतो आम्ही आई-वडिलांवर पती-पत्नी अपत्यावर,

बहीण भावावर मैत्र तर आहे समस्त मानवजातीबरोबर,
माहित आहे तुमचा परिवार नाही बनणार आम्ही,
पण कुटुंब आणि वसुधैव कुटुंबकमही आमचेच,
आहेत आमचे आधुनिक विचार आणि आचार,
त्याचसाठी हक्क मानतो परवडणारे पेट्रोेल डिझेल घर,

पाणी रस्ता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आरोग्य रोजगार,
 पृथ्वीचे रहिवासी आमचं दुसरं तिसरं असं काही नसतं
फक्त प्रेम म्हणजे प्रेमच असतं.

प्रेमाचा दिवस, valentine day असं ठरवून, त्या दिवशीच आणि तेव्हाच प्रेम करता येत नाही. हे काहीतरीच पाश्‍चिमात्य फॅड असा सूर लावला जातो. माणूस समाजप्रिय व उत्सवप्रिय ही असतो. आपल्याकडे तर अगदी ऋतुमानानुसार प्रत्येक महिन्यागणिक प्रत्येक नातेसंबंधाचे महत्व म्हणून असे किती तरी सण-उत्सव आहेत. मग हे असं व्हॅलेंटाईन डेप्रेमाचा दिवस हवा कशाला? आमच्याकडे खजुराहो शिल्प आहेत. आम्ही आई-वडिलांवर, भाऊ- बहिणी बहिणी-बहिणी, अपत्य प्रेम, पति-पत्नी, मित्र-मैत्रिणी ही अशी रक्ताचीच नव्हे तर इतरही प्रेमाची नाती आहेतच ना. त्यासाठी हे प्रदर्शन  कशाला? खरं म्हणजे या दिवसाची आठवण मार्केटींग तंत्रामुळे सर्वांना होते. परंतु आजचा माहोल, आपला आसपास, समाजभान पाहता प्रेम म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने करण्याचं, जगण्यासाठी आवश्यक असणारी, सहेतुक जगण्याला निमित्त देते हे सांगाव लागत असल्याचा काळ आहे. प्रेम स्वतःबरोबर, घरातील इतरांची काळजी घ्यायला शिकविते. जीवन सुंदर करते. त्यादृष्टीने बोलते होणे गरजेचं आहे.
प्रेम, प्रीति, इश्क, मुहब्बत, लव्ह यांचा विचार करता आपण अगदी दोन्ही बाजूनी बोलू शकतो,
इश्क ने गालिब
निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के

त्याचवेळी प्रेमासंबंधी दुसर्‍या बाजूने म्हणता येते की—
इश्क जब तक ना कर चुके रुसवा
आदमी काम का नही होता.

व्हॅलेंटाईन डे निमित्ताने म्हणा किंवा हिवाळ्यातील आल्हाददायक, उत्साही आणि उत्सवी वातावरणाचा महिना म्हणूनही चालेल आपण आपल्या स्वतःबरोबर घरातील प्रत्येक सदस्यांशी व इतरांशी ही संवाद साधला पाहिजे. आपण भारतीय कुटुंब आणि परिवाराला मानणारे, जपणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे. कुटुंब म्हणजेच समाजाचं छोटे युनिट. कुटुंबातीलच स्त्री सदस्यांच्या अडचणी, बाहेरील  जगताकडून वाट्याला येणारे अपमान, छेडछाड यावर बोललं की मनही मोकळं होतं मार्गही दिसतो. आपलं दुःख आपल्या पत्नीचे दुःख घरातील सदस्यांचे दुःख तेच इतरांचंही दुःख आहे लक्षात येतं आणि माणूस संवेदनशील होतो. संवेदनशील माणूस मग दुसर्‍यांच्या दुःखाचं, अपमानाचं कारण ठरणार नाही. प्रेमासाठी संवेदनशील असणे अपरिहार्यच. प्रेम म्हणजे केवळ लैंगिक भावना नाही तर नातेसंबंधातील सुधार, माणसा-माणसातील सशक्त नातं, माणुसकीची नाती आणि मानवताधर्माचे पालन म्हणजेच प्रेम होय. पाच हजार वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला भारत हा अतिप्राचीन सनातन देश म्हणजेच  प्रदिर्घ संस्कृती असलेला देश. आपल्या इतिहासाकडे पाहताना हजारो वर्ष अत्यंत हिणकस अशा स्वयंघोषित उच्चवर्णीयांनी, सरंजामशाही वृत्तीने केलेल्या सामाजिक आणि आर्थिक शोषणाचा इतिहास आणि त्यासाठी सर्वसामान्यांनी केलेला संघर्ष आहे. सर्वसामान्यांनी केलेले प्रचंड श्रम, कष्ट, त्याग, घेतलेली उत्पादने, नवनिर्मिती अचंबित करणारी आहे परंतु लेखणी मोजक्याच लोकांच्या हाती असल्याने त्यांनी सोयीस्कर इतिहास लिहिला. भारत देश म्हटलं की बुद्धांचा भारत, गांधींचा भारत, संत परंपरा असलेला भारत, विविधतेत एकता असलेला भारत आणि हे सर्व टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच आपली संस्कृती आणि इतिहास. गंगा-जमुना संस्कृती म्हणजेच परस्परांवर प्रेम. सहिष्णुता आणि एकमेका सहकार्य करू आणि प्रेम देऊ आणि घेऊही. दुर्दैवाने आज देशाचे वास्तव म्हणजे केवळ एक आभासी शत्रू निर्माण करून जगण्याचे, वास्तवातले आणि कळीचे प्रश्‍न बाजूला सारून व भावनिक होऊन पसरविलेला जातीय-धार्मिक तेढ, हाताला व डोक्याला चालना देणारा रोजगार व नोकरी नसलेला प्रचंड मोठा तरुण वर्ग, स्त्री-पुरुष असमानता, देशाची नैसर्गिक संसाधन, संपत्ती 145 उद्योगपती घराण्याकडे आणि त्यासाठी भरपगारी राबणारे शासन-प्रशासन, नेते-पुढारी, व्यवस्था-यंत्रणा इतकी भयानक पोखरली आहे की तिचा भेसूर व भयभीत चेहरा पाहून मन बेचैन व अस्वस्थ होते. असं वास्तव असताना तुम्ही आम्ही अशा सर्वांनी मिळून देश आणि समाजात जाणूनबुजून पसरविलेली घृणा, द्वेष, तिरस्कार, असूया यांच्या तटबंदी भिंती तोडून परस्पर सौहार्द, सौजन्य, सहकार्य, समन्वय आणि प्रेमाची रोपटी पुन्हा रुजवावी लागतील.


प्राचीन परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतात श्रेष्ठ-कनिष्ठ सामाजिक अवस्थेत  विभागलेला समाज अज्ञान, दारिद्य्र आणि मागासलेपणातच खिचपत पडला आहे कारण सरंजामशाही, भांडवलशाही आणि पुरोहितशाही वृत्तीने वेगवेगळे नाव व भिन्नभिन्न रूप, मुखवटे धारण करून केलेले आर्थिक शोषण हेच महत्त्वपूर्ण कारण आहे. सन्मानाने, प्रतिष्ठेने, सद्भावनेने, सकारात्मकतेने, माणूस म्हणून प्रेमाने जगण्याचा अधिकार दिला तो लोकशाही आणि राज्य घटनेने. मानवताधर्मावर, प्रेमधर्मावर, स्त्री-पुरुष समानतेवर, मानवी मूल्यांवर प्रेम करायला शिकवले ते सावित्रीबाई, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर, भगतसिंग, महात्मा गांधी, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर इत्यादी अनेकानेक मान्यवरांनी. ताराबाई शिंदे यांनी तर स्त्री पुरुष तुलना या ग्रंथात दुटप्पी पुरुषप्रधान मानसिकतेचे वास्तव रेखाटले आहे. आज स्त्रियाच नव्हे तर पुरुषांच्याही स्वातंत्र्याचा, प्रेमाचा संकोच होत आहे. भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. जिथे जगण्याचीच भ्रांत तिथे प्रेम कधी करणार? असं सगळं वातावरण. म्हणून या काळोखातून वाट काढताच येणार नाहीच का असं वाटण्याचा हा काळ आहे. असं असलं तरी अनेक  मोठ्या जमेच्या बाजूही आहेत. जगामध्ये तरुणांची संख्या जास्त असलेला तरुण देश म्हणजेच भारत देश. इतका तरुण की त्याचे सरासरी वय अवघे साडे अठ्ठावीस वर्ष. हे तरुण वय म्हणजेच साहसी, अन्याय, अत्याचार, मान्य न करणारे, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रेमशक्ती असलेले, प्रसंगी बंडखोरी करणारे हे वय. तेव्हा एकत्र येत लोकशाही मार्गाने सर्वांनाच  प्रेमाने, आनंदाने जगण्यासाठी निरोगी व स्वास्थ्यवर्धक वातावरण आवश्यक आहे हे ठणकावून सांगावे लागेल. हे करता येणे शक्यही आहे कारण हे जग चालतं ते विश्‍वासावर, नैतिक  मूल्यावरील प्रेम, देशावर असलेले प्रेमावर एकंदरीतच मानवजातीवर असलेल्या प्रेमावरच.


समाजाने योजलेल्या  लिंगभेदाच्या बंधनापलिकडे आपण स्त्रीचा माणूस म्हणून आणि पुरुषाचा देखील माणूस म्हणून विचार करावा लागेल. प्रेम हेच परिवर्तन करू शकतं, बदल घडवू शकतं, समानतेचा समाज निर्माण करू शकतो. प्रेम क्रांती घडवू शकते. तेव्हा आज आपण स्त्री-पुरुष सुदृढ, सशक्त आणि निरोगी नातं बनण्यासाठी बोलत राहणं म्हणजे चुकीच्या मतांवर, वागण्यावर खुलेपणाने बोलणे त्या सुधारत पुढे जाणे गरजेचे आहे. संवादी राहणे एकमेकांच्या मताचा आदर  सन्मान करणे हे निश्‍चितच प्रेमाने करू शकतो. अहिमसा आणि प्रेमाच्या मार्गाने एकत्र यायला कायद्याची ना नाही. परंतु प्रेमावर घाला घालणार्‍यावर, सामाजिक असुरक्षितता निर्माण करणार्‍यांवर मात्र कायद्याची हरकत आहे हे महत्त्वाचे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन इंटरनेटमुळे आपल्याला एकत्र येणे, प्रबोधन करणे, स्त्री-पुरुष निकोप वातावरण तयार करण्यासाठी इतरांशी जोडून घेत जे चांगलं आहे, मानव प्रेमाच आहे, उपयोगाचं आहे ते ते घेता येऊ शकतं. सोशल मीडियाचा सकारात्मकपणे वापर करत एकाच वेळी फार मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरच नव्हे तर विश्‍वाशी नातं जोडायला नक्कीच उपयोग करता येईल.कारण प्रेम ही भावना सुद्धा लोकल ही आहे आणि ग्लोबल ही आहे. याचीच ग्वाही देणारी मा.क.वळंज यांची कविता
  नव्या जडणघडणीचे आम्ही  

दीपस्तंभ ठरुया
दंभ कटुता अवहेलना सर्वत्र तिरस्कारुया
मता सद्भाव विश्‍वबंधुत्व पुरस्कारुया
नव्या दमाने नव्या दिलाने
सर्वांना मिळवूया
विश्‍वामधल्या दीन जनांचे
अश्रू पुसूया
अखंड दुर्बल पतीतांचे
जयगान गाऊया
नव्या मानवाची
यशोपताका नभी भिडवूया

Exit mobile version