महाडमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी

सहा लाखांचा ऐवज लंपास

| महाड | प्रतिनिधी |

शहरातील चांभारखिंड येथे हायवे प्लाझा इमारत आहे. चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखाची रोकड, असे एकूण सहा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदरची घटना शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. भर दुपारच्या सुमारास ही चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत स्वप्नाली अनंत शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्याविरोधात महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन महिन्यापासून सदर फ्लॅटचे अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरु असल्याने शिंदे या आपले सासरे व मुलासोबत याच इमारतीतील वरच्या मजल्यावर राहत होत्या. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यानी हे बंद घर फोडून ही धाडसी चोरी केली. तपासासाठी पोलिसांकडून श्वानपथकाची मदत घेतली जाणार आहे. या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version