लाखोंचा ऐवज चोरीला; नागरिकांमध्ये भितीचे वातावारण
। महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे सत्र सुरू असून आज (दि.27) दिवसाढवळ्या शहरातील मध्यवर्ती वस्तीतील गवळ आळीमध्ये घरफोडीची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आला आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गवळ आळीमधील वामन स्मृती इमारतीमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मजल्यावरील सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी ही घरफोडी झालेली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दुपारी दोनच्या सुमारास बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावून तसेच दरवाज्यावरील आय होलला बाहेरून स्टिकर लावून दिघे यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरटयांनी घरातील पाच तोळ्याचे मंगळसूत्र, बारा ग्रॅमचा हार व दोन एक-एक ग्रॅमच्या अंगठ्या असा अंदाजे चार लाख किंमतीचा ऐवज लंपास केला.
याबाबत सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस हवालदार लांगे व पवार या बाबत अधिक तपास करत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीमुळे महाडमधील नागरिक भयभीत झाले आहेत.