पंचायत समितीमधील कचऱ्याची विल्हेवाट
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग पंचायत समितीच्या इमारतीमधील लिफ्टची आरक्षीत जागा कचरा कुंडीचा अड्डा बनला होता. इमारतीमध्येच हा प्रकार घडल्याने कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कृषीवलच्या दणक्याने पंचायत समिती प्रशासन जागे झाले. साचलेला कचरा कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढण्यास सुरुवात केल्याने अनेकांनी कृषीवलचे आभार व्यक्त केले.
पंचायत समितीच्या कार्यालयासह बांधकाम, शिक्षण विभागातील कार्यालयात वेगवेगळ्या शासकिय कामासाठी नागरिकांची वर्दळ असते. बांधलेल्या या इमारतीमध्ये लिफ्टसाठी आरक्षित असलेल्या जागेत प्लास्टीक बाटल्या व अन्य कचऱ्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे ही इमारत कचरा कुंडीचा अड्डाच बनल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग पंचायत समितीची 2015 मध्ये नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना चढण्या व उतरण्यासाठी इमारतीमधील जागा गेल्या अनेक वर्षापासून लिफ्टसाठी आरक्षित आहे. मात्र याच लिफ्टच्या जागेत प्लास्टीक बाटल्या व थर्माकोल व इतर कचरा टाकला जात होता. त्यामुळे ते एक कचरा कुंडीचा अड्डाच बनला होता. दैनिक कृषीवल मार्फत याबाब लेखणीद्वारे आवाज उठविण्यात आला. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कृषीवलच्या बातमीच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारी सकाळी पंचायत समिती कर्मचारी लिफ्टच्या आरक्षीत जागेत साचलेला कचरा काढत होते. त्यामुळे कृषीवलचे अनेकांकडून कौतूक करण्यात येत आहे.