उरणमध्ये दिवसाढवळ्या खारफुटीची कत्तल

। उरण । वार्ताहर ।

उरण परिसरात दिवसाढवळ्या कोणतीही परवानगी न घेता, प्रशासनाची भीती न बाळगता खुलेआम खारफटीची कत्तल सुरू आहे. याबाबत कोणी तक्रार केली तर अधिकारी वर्ग कारवाई करण्याचे सोडून ते मिटवून टाका, असा उपदेशाचा फेस देऊन आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारदार सांगत आहेत.

उरण खाडी किनारी असलेल्या कांदळवन, खारफुटी जंगलाची कत्तल करण्यास मनाई आहे. मात्र, कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरु आहे. अनधिकृत बांधकामे करण्यासाठी भूमाफिया अशा प्रकारे मातीचा भराव टाकून खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरु आहे. वास्तविक खारफुटीची वनस्पती ही पूर संरक्षक असल्याने त्या घनदाट जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांची आहे. मात्र, दिवसाढवळ्या खाडी किनारी मातीचे भराव टाकून खाडी पात्र बुजविण्यात येत असताना देखील वन विभाग, महसूल विभाग आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

उरण परिसरातील मोरा, करंजा, केगांव, आवरा, जेएनपीटी तसेच खाडी किनारी गावालगत सरळसरळ खारफुटीवर भराव करून टोलेजंग इमारतीं उभ्या राहिल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होतासना दिसत नाही. केगांव परिसरातील समुद्र किनारी खुलेआम खारफुटीची कत्तल सुरू आहे. याबाबत तेथील ग्रामस्थ व सरपंच यांनी महसूल विभागाला कळवूनही खारफुटीची कत्तल सुरू असल्याचे सांगितले आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल येथील जनतेकडून केला जात आहे.

Exit mobile version