पाली भुतीवली धरणात मृतदेह

| नेरळ | प्रतिनिधी |
पाली भुतीवली येथे असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्प मध्ये एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह दोन दिवसापूर्वीच असावा असे पोलिसांकडून सांगण्यात येत असून सदर व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, की घातपात आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भुतीवली गावचे पोलीस पाटील प्रदीप गायकर यांना धरणामध्ये मृतदेह आढळून आला असल्याचा निरोप मिळाला. त्यानंतर पोलीस पाटील गायकर यांनी स्वतः खात्री केली आणि नेरळ पोलिसांना कळविले. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर तसेच पोलीस कर्मचारी मुनेश्वर हे पोहचले.

नेरळ पोलिसांनी माहिती देतांच कर्जत पोलीस उपअधीक्षक अनिल लगारे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन गायकर, महसूल मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी प्रवीण साळुंखे यांच्या उपस्थितीत धरणाच्या कडेला असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.

त्या मृतदेहाच्या पायात शूज असून त्याने सफेद रंगाचा फुल शर्ट परिधान केला होता, तर देहयष्टीने मजबूत असलेल्या त्या तरुणाचे वय साधारण 33-35 असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.त्या तरुणाच्या उजव्या हातात कडा असून दुसऱ्या हातात काळया रंगाचा धागा आहे.याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून हा मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असावा, असे सांगण्यात आले आहे

Exit mobile version