| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाली भूतीवलीतील लघुपाटबंधारे प्रकल्प येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाला आहे. चार तरुण मुंबई घाटकोपर येथून मंगळवार, (दि. 29) रोजी पर्यटनासाठी आले होते. रिहान आसिफ अरब, (16) , रा. नारायण नगर घाटकोपर वेस्ट, रेहान शकील अहमद शेख, (16 ), रा. असेल्फा घाटकोपर वेस्ट, वाहिद मुबारक मकानदार, (16), रा घाटकोपर, मनीष छोटेलाल कानोजिया, (18) , रा. घाटकोपर वेस्ट हिमालय सोसायटी अशी त्यांची नावे असून, ते मुंबई येथून लोकलने भिवपुरी रोड येथे आले.
तेथून चालत पाली भुतीवली धरणाच्या येथे पोहचले आणि मौजमजा करू लागले. धरण पाहून हे तरुण तेथे मॅगी बनवून खाण्यासाठी धरणाच्या किनारी आले. तेथे हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरले असता, त्यापैकी मनीष हा खोल पाण्यात गेला असता त्याला खोलीचा अंदाज आला नाही. मनीष पाण्याबाहेर येत नसल्याने ते तिघे तरुण घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. याबाबत नेरळ पोलीस ठाणे यांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्याआधी स्थानिक लोकांनी त्या तरुणाला शोधण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या, मात्र धरणात बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नाही.
स्थानिकांच्या प्रयत्नांना अपयश येत असल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी खोपोली येथील रेस्न्यु टीम यांना पाचारण केले. तेथील अपघातग्रस्त टीमच्या पथकाचे प्रमुख गुरुनाथ साठलेकर यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता खोपोली येथील अपघात ग्रस्तांच्या टीममधील पथकाला पाली भूतीवळी धरणाच्या पाण्यातून मनीष छोटेलाल कानोजिया याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी नेरळ पोलीस आणि स्थानिक उपस्थित होते.