। पंढरपूर । वृत्तसंस्था ।
पंढरपूरच्या शाळेत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये चक्क मृत बेडूक सापडला आहे. या प्रकारामुळे अंगणवाडीतील आहार खायाचा की नाही, असा प्रश्न लहान मुलांसह पालकांना पडला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. त्यातीलच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचीही योजना राबवत आहे. मात्र, योग्य नियोजन आणि स्वच्छता न पाळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात पोषण आहारामध्ये मृत साप आढळला होता. असाच धक्कादायक प्रकार आता पंढरपूरमध्ये घडला आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगरमधील अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये बेडकाचे मृत पिल्लू सापडले आहे. त्यामुळे पालकवर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, लहान मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरूच असल्याची टीका पालकांकडून केली जात आहे. तर, शासनाकडून मिळणार पोषण आहार खायचा की नाही, असा प्रश्न लहान मुलांसह पालकांना पडला आहे.