किसान सन्मान योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

। पनवेल । वार्ताहर ।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत असून संकेतस्थळावर स्वतः किंवा सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक सुविधेद्वारे ई-केवायसी करता येणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी आहेत. यामध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात दिले जातात. हा लाभ सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. पनवेल तालुक्यात एकूण 9 हजार 729 पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी 80 टक्के शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण केली आहे; पण ज्यांनी केलेली नाही, त्यांचे पुढील सर्व हप्ते थांबवले जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.


प्रति लाभार्थी फक्त 15 रुपयांचा खर्च
पीएम किसान पोर्टरवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना यासाठी संकेतस्थळावर ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करण्यासाठी प्रति लाभार्थी 15 रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे लाभार्थी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करावी.

– विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल


Exit mobile version