शिक्षण विभाग सुस्त, आयोजक मस्त; पत्रकार संघाकडून ठोस उपाययोजनांची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी मिळावी, इतिहासाची ओळख व्हावी, विज्ञानाची गोडी लागावी आणि शैक्षणिक अनुभवातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे, या उदात्त हेतूने शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, काही खासगी शाळा आणि क्लासेसनी या सहलींचे चक्क ‘रिसॉर्ट सफरी’मध्ये रूपांतर केले आहे. गड-किल्ले, विज्ञान केंद्रे, संग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे बाजूला सारून समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि मौजमजेच्या ठिकाणांना पसंती दिली जात असल्याने शैक्षणिक सहलींचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे. त्यातच नुकत्याच घडलेल्या दुदैवी घटनांमुळे शिक्षण विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
उरण तालुक्यासह राज्यभरातील अनेक खासगी शाळा आणि क्लासेसकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, काही ठिकाणी या सहलींचे स्वरूप ज्ञानवर्धक न राहता पर्यटन आणि मौजमजेपुरते मर्यादित राहत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, विज्ञान आणि संस्कृतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी, हा वार्षिक सहलींमागचा उद्देश आहे. मात्र, हा उद्देश बाजूला ठेवून केवळ पर्यटनस्थळांची निवड केली जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या सहलींसाठी पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाते. त्यामुळे पालक मुलांच्या ज्ञानासाठी पैसे खर्च करतात की, रिसॉर्टमधील मौजमजेसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलीकडेच मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर समुद्रकिनारी आयोजित सहलीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी बुडण्याच्या घटनेने या बेजबाबदार नियोजनाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. समुद्रकिनारे, खोल पाणी आणि धोकादायक पर्यटनस्थळांवर विद्यार्थ्यांना नेताना विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांची पुरेशी संख्या, प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी, जीवरक्षक, प्राथमिक उपचारांची व्यवस्था, पालकांची संमती आणि सुरक्षित वाहतूक याबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही. एका निष्काळजीपणामुळे एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो, याचे भान सहल आयोजकांनी ठेवावे. विशेष म्हणजे, अशा सहलींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षण विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे शैक्षणिक सहली म्हणजे शिक्षकांची मौजमजा किंवा खासगी संस्थांचा पर्यटन व्यवसाय नाही. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे बोलले जात आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने शैक्षणिक सहलींच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळ करणाऱ्या शाळा व खासगी क्लासेसची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी गटशिक्षणाधिकारी पवार यांच्याकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व क्लासेसवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसह शिक्षण विभागाने आता केवळ कागदी आदेश काढून जबाबदारी झटकू नये. तालुक्यातील सर्व शाळा आणि खासगी क्लासेसच्या सहलींची चौकशी करावी. सहलींचे नियोजन, शुल्क, सुरक्षा व्यवस्था आणि नियमांचे पालन यांचा सविस्तर आढावा घ्यावा. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडून शाळा आणि क्लासेसच्या सहलींची तपासणी होते का? आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर काही नियंत्रण आहे का? सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? की दुर्घटना घडल्यावरच चौकशीचे नाटक सुरू होते? तसेच, सहलींचे आयोजन करताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक सुरक्षा व्यवस्था काय? प्रशिक्षित जीवरक्षक, सुरक्षा साधने आणि योग्य देखरेखीची व्यवस्था काय, या प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने जनतेला द्यावीत.






