नोकरी नसल्याच्या तणावाने एकाचा विष पिऊन मृत्यू

। देवरुख । प्रतिनिधी ।
संगमेश्‍वर तालुक्यातील मारळ येथील विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान रविवारी 5 सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित शरद पवार ( वय 23 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन केल्याचे रोहित याने पोलीस जबाबात नमूद केले आहे. रोहित पवार यांचे मूळ गाव संगमेश्‍वर तालुक्यातील मारळ हेे आहे. कामानिमित्त तो रत्नागिरी येथे वास्तव्याला होता. रोहित हा दोन दिवसापूर्वी येथील घरी आला होता. अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने वडिलांनी त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी रोहित याने आपण उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याचे वैद्यकीय सूत्रांना सांगितले. यामुळे अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्री रोहीत याचा मृत्यू झाल्याची माहिती अंगवलीचे बीट अंमलदार संदेश जाधव यांनी रविवारी दिली आहे. नोकरी मिळत नाही याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे. रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात रोहित याच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारळ येथील स्मशानभूमीत रोहित याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version