। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वहिनीच्या निधनाने शोकाकूळ झालेल्या दिराचे स्मशानभुमीतच अंत्यसंस्काराच्या विधी प्रसंगी हृदयविकाराने निधन झाल्याची घटना अलिबाग कोळीवाडयात घडली. पाच तासातच एकाच घरात दोघाजणांचे निधन झाल्याने कोळीवाडा परिसर शोकाकूळ झाला आहे.
अलिबाग कोळीवाड्यात आज सकाळी 11 च्या सुमारास शेकापक्षाचे कार्यकर्ते दिनेश मुकादम यांच्या आई सुलोचना परशुराम मुकादम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्यावर अलिबाग कोळीवाडा येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार विधी करत असतानाच त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर त्यांचे दिर दिगंबर शांताराम मुकादम यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. रामदास बोटीच्या दुर्घटनेतून बचावलेले स्व. बारकूशेट मुकादम यांचे ते भाऊ होत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नगरसेवक अनिल चोपडा, रवि थोरात आदी शेकापचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.