थाळीनाद करुन व्यवस्थापनाचा निषेध
| रसायनी | प्रतिनिधी |
पाताळगंगा एमआयडीसी परिसरातील कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी कैरे येथील प्रकल्पग्रस्तांनी 16 ऑगस्ट रोजी साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु, अद्याप कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय्य हक्कांसाठी आमरण उपोषण करणार असल्याचे कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी सांगितले.
कैरे येथील सचिन पाटील, वासुदेव पाटील, मंदार पाटील यांच्या वडिलोपार्जित जमिनी कॅस्ट्रॉल कंपनीच्या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. या तिघांनी आपल्याला कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी कॅस्ट्रॉल कंपनीकडे वारंवार विनंती केली; परंतु कंपनीने त्यांची मागणी धुडकावून लावली. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी कोकण श्रमिक संघाच्या श्रुती म्हात्रे यांच्याकडे मागणी केली. श्रुती म्हात्रे यांनी सचिन पाटील, वासुदेव पाटील, मंदार पाटील यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, त्यानुसार त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चाही केली; परंतु व्यवस्थापनाने या तिघांनाही नोकरीत सामावून घेण्यास नकार दिल्याने दि. 16 ऑगस्ट रोजी कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण चालू करण्यात आले. दि. 17 ऑगस्ट रोजी रसायनी पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापन, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे आणि उपोषणकर्त्यांना बोलावण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक टेंबे यांनी या तिघांनाही नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले, तसेच लेखी लिहून देण्याचेही कबूल केले. परंतु, पोलीस ठाण्यामधून बाहेर पडून काही तास झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लेखी लिहून दिले नाही तसेच विचारणा केली असता आपण या तिघांना नोकरीत सामावून घेण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रुती म्हात्रे आणि आंदोलनकर्त्यांचा चांगलाच पारा चढला. त्यांची व्यवस्थापनाची शाब्दिक चकमक झाली. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. 18 रोजी सायंकाळी कंपनीच्या बस व व्यवस्थापनाच्या गाड्या कंपनी गेटच्या बाहेर पडत असतानाच आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांसमोर थाळीनाद करून व्यवस्थापनाचा निषेध केला.
दरम्यान, कॅस्ट्रॉल कंपनीचे व्यवस्थापन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना घेण्यास तयार नसल्याने सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी घेतला आहे. या उपोषणात उपोषणकर्त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशारा श्रुती म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी आमरण उपोषणास माजी आ. मनोहर भोईर, सुरेश लाड यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे समजते.