अल्पवयीन गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

पाच जणांवर गुन्हा दाखल
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील विकासवाडी, परळी येथील एका 14 वर्षीय विवाहितेचा गर्भधारणेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पिडीतेचा विवाह फेब्रुवारी 2020 मध्ये सागर पवार (18) या अल्पवयीन तरुणासोबत करुन देण्यात आले होते. दरम्यान, आपली पत्नी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्यांने तिच्यासह शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिला गर्भवती केले. यानुसार पिडीता 7 महिन्यांची गर्भवती असताना होणार्‍या त्रासामुळे तिला प्रसूतीसाठी अलिबाग येथील जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पिडीतेचा मृत्यू झाला.


यासंदर्भात सहा.फौजदार मोहन म्हात्रे यांनी पाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार भादवी कलम 376(2), (जे)(के), 376(3), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 10, 21 यासह बालविवाह अधिनियम 2006 चे कलम 10, 11 प्रमाणे पती सागर पवार, (18), सोनू पांडू पवार (55), भुरी सोनू पवार(55), मारुती गोपाळ हिलम(52) आणि अलका मारुती हिलम (48) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, बालविवाहाची शिकार झालेले अनेक निष्पाप मुलींना आपले प्राण गमवावे लागत आहे, वधू व वर यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने कोणतेही बालविवाह सारखे गुह्याचे पाऊल उचलू नये, असे आवाहन पाली पोलीसांनी केले आहे.

Exit mobile version