| नेरळ | संतोष पेरणे |
कर्जत तालुक्यातील मांडवणे ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील एका आदिवासी बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कर्जत शहरातील खासगी रुग्णालयात गरोदर महिला आणि तिचे बाळ या दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून आदिवासी समाज संतप्त झाला. तर उपचार करणारे डॉक्टर यांनी प्रचंड रक्तस्त्राव आणि कमी रक्तदाब तसेच ऑक्सिजन पातळी खालावल्याने रुग्ण दगावला असल्याचे स्पष्ट केले आहे.
फणस वाडी ही कातकरी समाजाची वस्ती आहे. तेथील अंकुश पवार यांची पत्नी शारदा या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. कळा येऊ लागल्याने तेथील अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविका यांनी शारदा पवार यांना कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथून दुपारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नैसर्गिक बाळंतपण होण्याची शक्यता कमी वाटत असल्याने रात्री नऊच्या सुमारास कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून त्यांना अन्यत्र हलविण्याची सूचना करण्यात आली.
रात्रीची वेळ असल्याने कर्जत शहरातील दहिवली भागात असलेल्या मातोश्री नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावत असल्याने कुटूंबियांकडे जवळ असलेली तीन हजार रुपये ही तुटपुंजी रक्कम मातोश्री रुग्णालयात भरून गरोदर महिला शारदा पवार यांना दाखल करून घेण्यात आले. रुग्णाची तपासणी केल्यावर गरोदर महिलेचे सिझेरियर करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तपासणीअंती बाळाच्या हृदयाचे ठोके कमी असल्याने यशस्वी बाळंतपण कठीण असल्याचेही सांगण्यात आले. त्यावेळी शारदा यांचे पती तसेच अन्य नातेवाईक यांनी बाळ दगावला तरी चालेल मात्र शारदा वाचली पाहिजे, असे सांगितले. रात्री साडे दहा वाजता गरोदर महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याने खोपोली येथील ब्लड बँकमधून रक्त आणण्यास सांगण्यात आले.त्यावेळी अंकुश पवार यांचे भाऊ अजय पवार हे दुचाकीवरून खोपोली येथे जाण्यास निघाले. दरम्यान, मातोश्री हॉस्पिटलचे बाहेरचे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे उपस्थित सर्व नातेवाईक बाहेरच बसून होते. रात्री बाराच्या सुमारास दवाखान्यातून डायपर आणायला सांगितल्याने बाळाचा जन्म झाला असेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णाबद्दल कोणतीही माहिती नातेवाईकांना दिली जात नव्हती.
पहाटे तीन वाजता खोपोली येथून सहा बाटल्या रक्त घेवून अजय पवार आले. रक्त आणल्याचे सांगताच दवाखान्यातील नर्सने रक्त ताब्यात घेवून पुन्हा कुलूप लावले. शारदा पवार यांची प्रकृती खालावल्याने पहाटे पाच वाजाता त्यांना शहरातील मूद्रे भागातील नवीन रुग्णालयात व्हेंटिलेटर लावण्यासाठी नेण्यात आले. रुग्णवाहिकेमागे फणसवाडी येथील आदिवासी, कातकरी समाजाचे ग्रामस्थही मूद्रे येथे पोहचले. रुग्णाची प्रकृती स्थिर नसल्याने आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे डॉक्टर सांगत होते. तर बाळंतपण सुखरूप झाले का? बाळ कसे आहे ? यापैकी कोणत्याही प्रश्नाची उत्तरे मातोश्री हॉस्पिटलकडून देण्यात येत नव्हती. शेवटी सकाळी दहा वाजता शारदा पवार यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
माधवी जोशी यांच्याकडून चौकशीची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या माधवी नरेश जोशी यांनी फणसवाडीमधील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जावून चौकशी केली. वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेवून सदर महिला चालत मातोश्री रुग्णालयात गेली होती, तर मग तिचा मृत्यू लगेच कसा होतो? असा सवाल उपस्थित केला असून महिलेवर करण्यात आलेल्या उपचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात केली आहे.