। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील थेऊरमध्ये लघुशंका करताना हटकल्याने तिघा जणांनी सुरक्षारक्षकासह त्याच्या पत्नीला दगडाने बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. आता जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल चव्हाण (29) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर असणार्या थेऊर भागात एका जमिनीचे प्लॉटिंग सुरू आहे. तिथे अक्षय चव्हाण त्याच्या बायकोसोबत रखवालदारीचे काम करत होता. शुक्रवारी रात्री एका गाडीतून तिघे जण उतरले आणि त्यांनी तिथे मोकळी जागा असल्यामुळे लघुशंका केली. त्यावेळी अक्षयने त्यांना हटकले. यातून त्या तिघांची आणि अक्षयची बाचाबाची झाली. दरम्यान, अजय मुंढे याने त्याच्याजवलील पिस्तुल ने हवेत गोळीबार केला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत दगड लागल्याने अक्षयची बायको जखमी झाली. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी लोणीकंद तपास पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून फॉर्च्युनर गाडी अडविली. या गाडीतील आरोपी सतीश लोखंडे, अजय मुंढे व भानुदास शेलार यांना अटक केली. रुग्णालयात दाखल असलेल्या शीतल यांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.







