पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वाजे येथील कुंडी धबधब्यावर आपल्या मित्रांसह वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा धबधब्याच्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्य हद्दीत कुंडी धबधबा येथे रविवारी मुंबई येथील शिवडी परिसरातील सहा मित्र फिरण्यासाठी गेले असता सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक मित्र नामे मौसिन मुघल (19) व त्याचा मित्र नामे सिद्धेश संजय माने (19) या दोघांचा पाय घसरून खाली पडले. यातील सिद्धेश हा एका मुलाचा पाय पकडून वर आला; परंतु मौसिन हा कुंडी धबधब्याच्या खोल खड्ड्यात पाण्यात बुडून मयत झाला. मयत मुलास स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने बाहेर काढून पनवेल जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता तेथे त्याला मयत घोषित केले. मौसेन याचे वडील परदेशात कामाला असून, तो एकूलता एक मुलगा होता. कॉलेजच्या कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता.