। रसायनी । वार्ताहर ।
मोबाईल चार्जरची तुटलेली वायर जोडत असताना शॉक लागल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. सदर बाबतीत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांभार्ली येथील राम गोपाळ (23) हा आपल्या घरात मोबाईल चार्जरची तुटलेली वायर जोडत असताना त्याला जोरदार शॉक लागला. त्यामध्ये राम गोपाळ हा बेशुध्द झाला. त्याला ताबडतोब चौक येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







