खारघर पोलिसांच्या 3 महिन्यांच्या तपासाला कधी दिसणार आशेचा किरण
। पनवेल । राज भंडारी ।
तळोजा जेलमध्ये असलेल्या आरोपीला 6 मार्च रोजी जेजे रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दिनांक 29 मार्च पर्यंत त्याच्यावर उपचार सुरू असताना अतिरक्तस्राव झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली. मात्र गेल्या 3 महिन्यांच्या पोलीस तपासात सदर आरोपींच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश मिळाले असल्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे आरोपीच्या नातेवाईकांना खारघर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अंधेरी ओशिवरा येथील मिल्लत नगरमध्ये राहणारा 71 वर्षीय आरोपी अब्दुल कलाम नुर इस्लाम शेख हा आपल्या गुन्ह्याची शिक्षा पनवेलमधील तळोजा जेलमध्ये भोगत होता. वयानुसार त्याला आजाराने ग्रासले. पोलिसांनी त्याला आजारपणाने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र 24 दिवसांच्या उपचारानंतर पोलिसांसह डॉक्टरांना देखील या आरोपी रुग्णाला वाचविण्यात यश मिळाले नाही. आरोपी अब्दुल कलाम नुर इस्लाम शेख हा समलिंगी प्रकरणातील आरोपी असून त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र तो आजारी असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी 24 दिवसांच्या उपचारानंतर त्याची प्राणज्योत मालवली.
यावेळी आरोपी आरोपी अब्दुल कलाम नुर इस्लाम शेख यांच्या नातेवाईकांचा खारघर पोलिसांनी शोध घेतला मात्र आरोपींच्या नातेवाईकांचा कोणताही ठावठिकाणा गेल्या 3 महिन्यात लागला नाही. अखेर खारघर पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे मयत आरोपीच्या नातेवाईकांना जेजे रुग्णालय मुंबई येथे अथवा खारघर पोलीस ठाण्याच्या 022-27742500 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.