| उरण | वार्ताहर |
विधणे ग्रामपंचायत हद्दीत दुधाळू म्हशीच्या अंगावर विद्युतवाहक तार पडल्याची घटना गुरूवारी (दि.23) सकाळी घडली. या घटनेत विजेच्या धक्का लागून म्हशीचा तडफडून मृत्यू झाला. यासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.
लहू भिवा भोईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या गोठ्याजवळून महावितरण कंपनीच्या विद्युतवाहक तारा जात आहेत. सदर धोकादायक विद्युतवाहक तारा हटविण्यासाठी लहू भोईर यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी केली होती. परंतु मागणीची दखल घेतली नाही.
लहू भोईर यांच्या गोठ्याजवळील म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने म्हशीने तडफडून हंबरडा फोडला. त्यामुळे लहू भोईर यांचे कुटुंब जागे झाले. त्यांनी उर्वरित म्हशीच्या गळ्यातील दोर कापले. त्यामुळे त्या म्हशी बचावल्या आहेत. झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लहू भोईर यांची सून, मूलगा थोडक्यात म्हशीच्या बचाव कार्यातून बचावले असले तरी अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने एका दुधाळू म्हशीचा तडफडून मृत्यू झाला आहे.
पशुसंवर्धन अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. लहू भोईर यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचारी, अभियंत्यांवर कारवाई करावी तसेच भोईर कुटुंबियांना नुकसानभरपाई तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नामदेव ठाकूर यांनी केली आहे.