विद्युत वाहक उपकरणे बसविली गटारात
| उरण | वार्ताहर |
नवघर-द्रोणागिरी नोड सेक्टर 12 येथील रहिवाशांना करण्यात येत असलेल्या विद्युत वाहक उपकरणे ही चक्क गटारात बसविण्याचा प्रताप महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे एखादी दुर्घटना घडून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशांकडून विचारला जात आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी (दि.23) विद्युत वाहक तार पडून विधणे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भोईर यांच्या दुधाळ म्हशीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या संदर्भात महावितरणवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच द्रोणागिरी नोड येथील सेक्टर 12 मधील रहिवाशांना विद्युतपुरवठा करण्यात येत असलेल्या विद्युत वाहक केबल, विद्युत उपकरणे ही चक्क गटारात बसविण्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे एखादी दुर्दैवी घटना घडून रहिवाशांच्या जीवितावर बेतली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशांकडून सध्या विचारला जात आहे.