जांभूळपाडा विजयनगर येथील दुर्घटना; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
। पाली । प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीजवाहिनी तुटून विजेचा धक्का बसल्याने दूध व्यावसायिकाच्या 3 म्हशी व एका गायीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सायंकाळच्या सुमारास घडली. यात दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ही घटना ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपूर्वी विजयनगर येथे विजेच्या खांबावरील वीज प्रवाह चालू असलेली वीजवाहिनी तुटून जमिनीवर गवतात पडल्याच्या अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. ही बाब तात्काळ नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवली, परंतु याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास 3 म्हशी व 3 गाय या दुधाळ जनावरांना तुटलेल्या विजवाहिनीचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. यामध्ये संतोष बबन वाळगुडे यांच्या ३ म्हशी व मंगेश दगडू वालगुडे यांची 3 गाय असा 3 दुभत्या जनावरांचा समावेश असून लाखो रुपयांचा आर्थिक फटका विजयनगर येथील दूध व्यवसायिकांना बसला आहे.
विजयनगर येथील शेतकरी यांच्या दुधाळ जनावरांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र यास सर्वस्वी त्या विभागातील महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून घेण्यात यावे.
– नरेश गायकवाड, अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना रायगड
सदर ठिकाणी विजेच्या पोल खांबावर एलटी वायरचा कंडक्टर तुटल्याने वीजवाहिनी तुटून खाली पडली. त्यामुळे जनावरांना विजेचा धक्का बसला व यात शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे दगावली. घटनास्थळी उपशाखा अभियंता भंडारे यांना तात्काळ या ठिकाणचा पंचनामा करण्यास सांगितले आहे.
– बालाजी चात्रे, शाखा अभियंता, पाली सुधागड







