| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटन स्थळी रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्या पथदिव्यांमधील वीज प्रवाह जमिनीवर उतरून विजेचा धक्का लागून असंख्य बेडूक मृत्युमुखी पडले आहेत. रविवारी रात्री आलेल्या पावसात ही घटना घडली असून अमन लॉज स्थानक परिसरात असलेल्या पथदिव्यांच्या आजूबाजूला बेडूक मरून पडल्याचे आढळून आले आहेत.
माथेरानमध्ये दस्तूरी ते अमन लॉज या परिसरात रस्त्याच्या बाजूला पथदिवे बसविण्यात आले आहेत. हे पथदिवे संध्याकाळी सहाच्या सुमारास सुरू केले जातात. गेली काही दिवस रात्रीच्या वेळी येणाऱ्या पावसामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये तेथे असलेले अनेक लहान बेडकांचा मृत्यू झाला. तसेच, रस्त्याच्याजवळ रेलिंगसुध्दा आहे. या ठिकाणी रात्री अनेक पर्यटक येथून प्रवास करत असतात. त्यामुळे हे लवकरात लवकर बंद करण्यात यावा, अन्यथा एखद्याचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी माथेरान नगरपरिषद जबाबदार राहील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.