उपचाराअभावी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
| महाड | प्रतिनिधी |
दि. 29 मार्च रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बोरगाव येथील शेतावर विंचू दंशाने एका 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुरेश गोपाळ पवार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते बोरगाव-मोहोत, ता. महाड येथील रहिवासी होते. बोरगाव येथील घराशेजारी शेतावर काम करीत असताना त्यांना विंचू दंश झाला. विंचू दंश झाल्याचे समजताच सुरेश पवार यांना बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता पाठविण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले; परंतु सुरेश पवार यांना रस्त्यामध्येच उलट्या होण्यास सुरुवात झाली व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
सदरचा मृत्यूदेह बिरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण मृत्यूचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धेश मोरे हे करीत आहेत. विंचू दंशावर जागतिक संशोधन करणारे तज्ज्ञ महाड तालुक्यातील असूनदेखील मृत्यू होणे म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना. उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.