| महाड | प्रतिनीधी |
दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला असून केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळली आहे. त्या तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील को.ए.सो. विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी दि.19 रोजी सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून महाडला आली होती. मात्र, संध्याकाळी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार गेली दोन दिवस तिचा शोध सुरू होता. महामार्गालगत केंबुर्ली नजीक एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ती चालत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढे ती आढळून आली नाही. तिच्या घरच्यांनी गुरुवारी सकाळी केंबुर्ली परिसरात पुन्हा शोध सुरू केला असता केंबुर्ली गावाच्या परिसरात नदीकिनारी असलेल्या झाडीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या वडिलांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली असता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. सदर मुलीने गळफास घेतल्याबाबतचे कोणतेच कारण पुढे आले नाही. याबाबत महाड शहर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.