जेएनपीए, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील बहुतांश पुलांवर अवजड वाहतुकीमुळे सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पुलावरील खड्ड्यात वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचे खड्डे ठरणाऱ्या या गंभीर समस्येकडे जेएनपीए, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. पर्यायाने या खड्ड्यांमुळे कोणाचा जीव जाण्याअगोदर हे खड्डे चांगल्या प्रकारे बुजविण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
तालुक्याच्या पूर्व विभागाला पश्चिम विभागाशी जोडण्यासाठी 30 वर्षांपूर्वी खोपटा पूल बांधण्यात आले. मात्र, जेएनपीटीच्या माध्यमातून विकास होत असताना पूर्व विभागाचा विकास होत गेला आणि या परिसरात मोठ मोठे सीएफएस कंटेनर यार्ड तयार झाले. पर्यायाने हा पूल पूर्व भागातील जनतेच्या प्रगतीसाठी लाईफलाईन ठरला. मात्र, वाढत्या छोट्या-मोठ्या प्रकल्पांमुळे वाहनांची वर्दळ वाढत गेली. या वाढत्या वाहनांच्या प्रमाणापेक्षा जास्त अवजड वाहतुकीमुळे येथील खोपटा पुलावर मृत्यूचे खड्डे निर्माण झाले आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की, त्यामुळे अनेक प्रवाशांचे कमरेचे आजार उद्भवून वाहनेही खराब झाली आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खोपटा पूल कमकुवत झाला आहे.
जेएनपीए बंदर आणि सिडको प्रशासनाने देश परदेशात मालाची निर्यात-आयात सुरळीत करण्यासाठी उरण, मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल शहरांना जोडण्यासाठी उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलाची उभारणी केली आहे. मात्र, जेएनपीए बंदर आणि सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या पावसाळ्यात नवघर, बोकडविरा, न्हावा शेवा पोलीस ठाणे, करळ, जासई, चिर्ले, पागोटे, धुतूम या परिसरातील पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तरी जेएनपीए बंदर, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पुलाची पाहणी करून पुलावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेऊन पुलावरील खड्डे अद्ययावत बुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
