। मुंबई । वृत्तसंस्था ।
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.
संजय राऊत यांना काल रात्री 9 वाजता एक त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना माहिती दिली आहे.
ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. राऊत यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे.