निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले; कामगार गंभीर जखमी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतमधून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला असून, एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या कामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. मालकाच्या बेजबाबदारपणामुळे अवघ्या एक महिन्यापूर्वी टाकलेला स्लॅब कोसळला आहे. ही घटना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
सांगवी येथील सनाधरा रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या बांधकामाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच हे बांधकाम कोणत्याही आर्किटेक्ट आणि इंजिनिअरच्या देखरेखीखाली करण्यात येत नव्हते. अशा स्थितीत मालकाचा बेजबाबदारपणा आणि त्याच्या हलगर्जीपणामुळे महिनाभरापूर्वी टाकलेला अख्खा स्लॅब पत्त्यासारखा कोसळला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा हा ढिगारा कोसळला, तेव्हा वेल्डिंगचे काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. लोखंडी अवजड बीममध्ये त्याचा पाय अडकला म्हणून तो थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच खोपोलीच्या हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. या रेस्क्यू टीमने वरून कधीही कोसळेल अशा अत्यंत धोकादायक स्ट्रक्चरच्या खाली उभे राहून, तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर मृत्यूच्या जबड्यातून मनोजला सुखरूप बाहेर काढले. या भीषण अपघातात फक्त मनोजच नाही, तर तिथे काम करणारे तीन स्थानिक आदिवासी बांधवही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, या रिसॉर्ट चालकाने एवढे मोठे तीन मजली स्ट्रक्चर उभे करताना कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला घेतला नव्हता. हा सरळ-सरळ निष्पाप लोकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, अनिल सोनोने आणि त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेत याप्रकरणी चौकशी केली आहे.







