शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव; शासकीय नियमांची पायमल्ली

महसूल, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |

शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासकांनी व भांडवलदारांनी उरण तालुक्यातील शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव टाकण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. रात्री अपरात्री सुरु असलेल्या डेब्रिजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भरधाव वेगात डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या डंपरला रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी महसूल, पोलीस यंत्रणेने सदर अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनमाणसांकडून करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शिवडी-न्हावा सीलिंक या दोन महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील शेतजमिनींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे काही भांडवलदारांनी, व्यवसायिकांनी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन आपआपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी आपला मोर्चा हा उरण तालुक्यात वळविला आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासकांनी व भांडवलदारांनी तालुक्यातील शेतजमिनी खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेऊन सदर शेतजमीनीत डेब्रिजचा भराव टाकण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे.

रात्री अपरात्री सुरु असलेल्या डेब्रिजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत असून भरधाव वेगात डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या डंपरला रात्री अपरात्री अपघात झाला तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तरी महसूल, पोलीस यंत्रणेने सदर अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनमाणसांकडून करण्यात येत आहे.

डेब्रिजची रॉयल्टी मिळत नाही. महसूल खात्याकडून पंचनामा करण्यात येतो. राॅयल्टी नसल्यामुळे महसूल मिळत नाही.

सी.आर.पाटील, मंडळ अधिकारी,
कोप्रोली उरण
Exit mobile version