| उरण | वार्ताहर |
उरण वन विभागाच्या अधिकार्यांनी विना परवाना गव्हाण-बेलपाडा वनविभागाच्या हद्दीतुन डेब्रिजची वाहतूक करणार्या 16 डंपरवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई, नवी मुबंई येथील डेब्रिज मोठ्या प्रमाणात उरण-पनवेल परिसरात कुठेही कधीही आणून टाकला जात आहे. उरण, पनवेल परिसारातील डोंगर नष्ट होत असताना आता गेली दोन तीन वर्षांपासून डेब्रिजची डोंगरे उभी रहाताना दिसत आहे. याबाबत उरण, पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी तहसिलपासून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि पर्यावरण विभागाकडे अनेक तक्रारी करूनही याची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही. त्यामुळे कारवाई होताना दिसत नाही. त्याचा फायदा डेब्रिज माफियांनी उचलत विनापरवाना भराव सुरू केला आहे.
याची खबर उरण वन विभागाचे वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांना लागताच त्यांनी सहकार्यांसोबत मोहीम सुरू केली त्यावेळी वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. घटनास्थळावरून विनापरवाना वाहतूक करणारे 16 डंपर अडवून कारवाई त्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. हे सर्व डंपर मुंबईतुन डेब्रिज घेऊन आले होते. वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना वाहतूक केल्यानेच कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरण वनविभागाचे वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी पत्रकारांना दिली.
डेब्रिजचा वापर या परिसरातील ठेकेदार ही मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जेएनपीए परिसरात भरावयाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अंधार्या रात्री डेब्रिजचा भराव केला जात आहे. याची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकारी वर्गाच्या आर्थिक हितसबंधामुळे सुरू असल्याचे एका अधिकार्यांने याला नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. तरी या परिसरात सुरू असलेल्या भरावयाची सखोल चौकशी करून डेब्रिजचा भराव करणार्या ठेकेदार व डंपर मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.