वरिष्ठ गट सुपर लीग क्रिकेट, धीरजची नाबाद द्विशतकी खेळी
| पुणे | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित वरिष्ठ गट सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना क्लब आणि एमसीए अध्यक्षीय संघाने अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या आधिक्यावर विजय प्राप्त केले. डेक्कन जिमखाना क्लब मैदानावरील दोन दिवसीय सामन्यात डेक्कन जिमखाना क्लबने सहारा संघाचा अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या आधिक्यावर विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा धीरज फटांगरेने केलेल्या नाबाद द्विशतकाचा होता. या सामन्यात सहारा संघाने प्रथम फलंदाजी करताना 340 धावा केल्या.
यावेळी अवधूत दांडेकरचे शतक चार धावांनी हुकले त्याने आठ चौकार व एक षटकारासह 94 धावा, रोहित काकडेने सात चौकार व तीन षटकारासह 75 धावा, तर आतिष वरपेने दहा चौकारासह 61 धावा केल्या त्यांना पीयूष अष्टेकरने 42 धावा करून सुरेख साथ दिली. यश बोरामणीने पाच तर दीपक डांगीने तान गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना डेक्कन जिमखाना क्लबने तीन बाद 356 धावा करून पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. त्यात महत्त्वाचा वाटा सलामीचा फलंदाज धीरज फटांगरेने केलेल्या नाबाद द्विशतकाचा होता त्याने 21 चौकार व तीन षटकारासह 200 धावांची खेळी केली त्याला यश क्षीरसागरने दहा चौकारासह 97 धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. यश क्षीरसागरचे शतक तीन धावांनी हुकले.
धीरज फटांगरेने प्रथम देवराज बेडारेच्या साथीत दुसर्या विकेटकरिता 42 धावांची तर यश क्षीरसागरच्या साथीत तिसर्या विकेटकरिता 249 धावांची भागीदारी केली. गहुंजे येथील एमसीएच्या मैदानावर झालेल्या दुसर्या लढतीत एमसीए अध्यक्षीय संघाने अनिर्णित सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिल्या डावाच्या आधिक्यावर पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एमसीए अध्यक्षीय संघाने नऊ बाद 390 धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा साहिल औताडेने केलेल्या नाबाद शतकाचा होता त्याने तेरा चौकार व दोन षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी केली त्याला साहिल पारखने बारा चौकार व दोन षटकारासह 78 धावांची, यासिर शेखने आठ चौकारासह 68 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. स्वप्नील चव्हाण, योगेश चव्हाण, आनंद ठेंगेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. यावेळी यासीर शेखने प्रथम साहिल पारखच्या साथीत दुसर्या विकेटकरिता 108 धावांची तर हृषीकेश सोनावणेच्या साथीत तिसर्या विकेटकरिता 55 धावांची भागीदारी केली.
प्रत्यूत्तर देताना छत्रपती संभाजीनगर संघाचा डाव 254 धावांत आटोपला यावेळी आदर्श जैनने चौदा चौकारांसह 81 धावांची, सूरज गोंडने सात चौकारासह 56 धावांची तर स्वप्नील चव्हाणने दहा चौकारासह 52 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. हृषीकेश सोनावणेने तीन तर स्नेहल खामणकरने दोन गडी बाद केले.