| मुंबई | प्रतिनिधी |
आमदार अपात्रेसंदर्भात आता लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल, असं स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण कायदेशी प्रक्रियेचं पालन केलं जाईल. तसेच सर्व नियमांचं आणि सांवैधानिक तरतुदींचं पालन केलं जाईल. त्यानुसारच याप्रकरणी कारवाई होईल. ही कारवाई लवकरात लवकर पार पडेल. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नार्वेकर यांना विचारण्यात आलं की आतापर्यंत काही आमदारांना बोलावून सुनावणी घेतली आहे का? त्यावर त्यांनी अद्याप नाही, सुनावणीसंदर्भात काही ड्राफ्ट इश्यूजसह इतर तयारी सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष सुनावणी होईल. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीस विलंब होत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता आणि पक्षचिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु ही याचिका लांबणीवर पडली आहे.
अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू असल्याने ठाकरे गटाच्या याचिका तीन-चार आठवड़यांनंतर सुनावणीसाठी घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.