बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची अलिबाग येथे घोषणा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील नवीन विश्रामगृह व रखडलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी अलिबाग येथे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अॅड. प्रवीण ठाकूर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी अलिबाग येथील नवीन विश्रामगृह व रखडलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याबाबत ना. चव्हाण यांचे लक्ष वेधून त्यांना तसे लेखी निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
अॅड. प्रवीण ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) मॉडेलनंतर हायब्रिड एन्युइटी मॉडेलनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अलिबाग ते रोहा या रस्त्याचे सुमारे 200 कोटींचे काम चार वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केले आहे. सदरचे काम अग्रवाल नामक ठेकेदार यांना मंजूर झाले आहे. परंतु, गेली दोन वर्षे सदरचे काम करण्यात आलेले नाही. अलिबाग-रोहा या रस्त्याचे काम हायब्रिड एन्युइटीमधील गुणवत्तेप्रमाणे करण्यात ठेकेदार अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे या कामासाठी नवीन ठेकेदार नेमून सदरचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी विनंती ठाकूर यांनी बांधकाममंत्री चव्हाण यांच्याकडे केली.
अलिबाग येथील शासकीय विश्रामगृह हे जुने झाले असून, अलिबागचा पर्यटनदृष्ट्या असलेला नावलौकिक व जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून या ठिकाणी प्रशस्त नवीन विश्रामगृह बांधण्यात यावे, अशीही मागणी यावेळी अॅड. प्रवीण ठाकूर यांनी केली. त्या मागणीसही बांधकाममंत्री चव्हाण यांनी सहमती दर्शवून अलिबाग-रोहा रस्ता व नवीन शासकीय विश्रामगृह या दोन्हीबाबत लवकरच मंत्रालयात बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले.




