बायोमायनिंगचा ठेका रद्द करण्याचा निर्णय

ठेकेदाराचे वेतन थांबवण्याचे निर्देश

| पालघर | प्रतिनिधी |

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे मीरा-भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून कचऱ्याची विल्हेवाट लावली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला असून कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. हा कचरा कमी करण्यासाठी महापालिकेने दोन वर्षापूर्वी बायोमायनिंगचा ठेका दिला होता. परंतु, ठेकेदार योग्य पद्धतीने आणि जलदगतीने काम करत नसल्यामुळे कचरा कमी झालेला नाही. यामुळे आयुक्त संजय काटकर यांनी हा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याची देयके थांबवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे 2005 साली 70 एकर शासकीय जागेत घनकचरा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पामध्ये शहरात दैंनदिन निर्माण होणारा कचरा टाकला जात आहे. सुरुवातीपासून प्रकल्पात कचरा टाकला जात असताना त्याची कोणतीही प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. यामुळे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्यामुळे स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

महापालिकेने या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 2014-15 मध्ये बीओटी तत्वावर मेसर्स हँजर बायोटेक मिरा प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीकडून पालिकेला रॉयल्टी दिली जात होती. परंतु, राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकिया प्रकल्प बंद पडला आहे. यानंतर दोन वर्ष याकडे लक्ष दिले गेले नाही. यामुळे तेथे टाकण्यात येणारा कचरा वाढतच राहिला. 2016 मध्ये राज्य शासनाने कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण बंधनकारक करत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंमलात आणला. यामुळे महापालिकेने गुजरातच्या अहमदाबाद येथील मेसर्स सौराष्ट्र एन्व्हायरो प्रा.लि. कंपनीची सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ (रिफ्युजल डिराईव्हड फ्युएल) तयार करण्यासाठी नियुक्ती केली. महापालिकेने गेल्या दोन वर्षापूर्वी नाशिकच्या मेसर्स ई.बी. एन्व्हायरो कंपनीला घनकचरा प्रकल्पात उभा राहिलेला कचऱ्याचा डोंगर नष्ट करण्यासाठी ठेका दिला होता. या कंपनीला ठेका देताना दिलेल्या अटी शर्तीनुसार कंपनीने काम केले नाही.

याबाबत स्थानिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही त्यावर ठोस कारवाई होत नव्हती. बायोमायनिंग प्रकल्पाची आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर बायोमायनिंगचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेत ठेकेदाराचे वेतन थांबवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

घनकचरा प्रकल्पात साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदाराला अनेक वेळा सूचना देऊनही काम केले जात नसल्यामुळे आयुक्तांच्या निर्देशानुसार ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर ठेकेदाराने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. ठेकेदाराकडून खुलासा प्राप्त होताच ठेका रद्द करण्याची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त
Exit mobile version