। चिपळूण । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत अर्ज, विनंत्या हे मार्ग आता संपले आहेत. आता तीव्र व निर्णायक आंदोलन असेल, असा इशारा आ. भास्कर जाधव यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली आहे. अनेक वर्षापासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आ. भास्कर जाधव आणि आ. शेखर निकम यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. या बाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही देण्यात आली आहेत. तरीही या कामाला गती आलेली नाही.
याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुढाकार घेतला असून, त्याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी चिपळूण येथे संयुक्तीक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, सचिन कदम,जयंद्रथ खताते, प्रशांत यादव, मिलिंद कापडी उपस्थित होते.
याप्रसंगी मुंबई – गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही, असे का होते आहे याचे कुतूहल आम्हालाही आहे़ नितीन गडकरी यांनी कोणतीही पूर्व तयारी नसताना, त्याचा डीपी तयार नसताना चिपळूणातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन केले. तो पूलही होऊ शकलेला नाही. नितीन गडकरी यांचा शब्द या कामाबाबतच का खाली पडतो, याचे आम्हालाही कुतूहल असल्याचा खोचक टोला आ. जाधव यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी 27 जानेवारीला रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत 22 रोजी बैठक घेण्यात येणार असून, आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. – आ. भास्कर जाधव