हेक्टरी 1 लाख, मजुरांना 25 हजारांची मदत द्या; शशिकांत शिंदेंचा रायगडातून सरकारवर निशाणा
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाणी आणि चाऱ्याची तीव्र कमतरता जाणवत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. कोकणातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रायगड दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत सरकारवर जोरदार निशाणा साधला. रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, तर मजुरांना 25 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळी तालुके टप्प्याटप्प्याने जाहीर करण्याच्या निर्णयावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. रायगडमध्ये केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकणाचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
रायगडकडे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. अनेक वर्षे रायगडला पालकमंत्री नव्हता. आता पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांनी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करावे, असे ते म्हणाले. सरकारने शेतकरी आणि जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, सरकारला जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपवर्गीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी सत्तेसाठी विविध समाजघटकांना आश्वासने दिली जात असल्याचा आरोप केला. विविध जाती-धर्मांमध्ये संघर्ष निर्माण करून सत्तेचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, समाज आता वस्तुस्थिती समजून घेत असल्याने परिवर्तन अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.
अजितदादा यांच्या मृत्यूबाबत बोलताना शशिकांत शिंदे यांनी सरकार, सीबीआय आणि सीआयडीकडून झालेल्या चौकशीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचा दावा केला. सत्य बाहेर आले पाहिजे, अशी जनतेची भावना असून ते अद्याप समोर येत नसल्याचे ते म्हणाले. इतके मोठे नेतृत्व केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत एफआयआर नसल्याने शंका उपस्थित होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
रायगडमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यावरही शिंदे यांनी भर दिला. रायगड हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा असून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केल्यास जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बँका आणि सावकारांनी संकटातील शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिजित दिपके यांच्या सामाजिक चळवळीबाबतही शिंदे यांनी भाष्य केले. ही चळवळ राजकीय पक्षविरहित आणि सामाजिक स्वरूपाची असल्याचे सांगत, अशा चळवळीत राजकीय पक्षांनी सहभागी होणे योग्य आहे का, यावर त्यांनी भूमिका मांडली. जनतेच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडी प्रभावीपणे एकत्र येऊन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरही निशाणा
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर टीका करताना हा मार्ग निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दयनीय अवस्थेत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ठेकेदारांची क्षमता न पाहता कामे दिल्याने महामार्गाची अवस्था झाली असून, या कामात पैशांची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामात दोषी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही शिंदे यांनी केली. दरम्यान, दिवेआगर समुद्र दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना सरकारने आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी केली.






