तालुक्यातील शेतीच्या प्रमाणात घट

6021.28 हेक्टर क्षेत्रात भातलागवड

| पनवेल | वार्ताहर |

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या पनवेल तालुक्यातील शेतीच्या लागवडीत घट झाली आहे. यंदा केवळ 6021.28 हेक्टर क्षेत्रात भातलागवड करण्यात आली असून, 2023मध्ये सात हजार हेक्टरच्या आसपास लागवड करण्यात आली होती; त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा पीकपेरा कमी झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाली होती; परंतु यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. भात हे पनवेलच्या ग्रामीण पट्ट्यातील महत्त्वाचे पीक आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भातपेरणीला सुरुवात झाली व जुलैअखेर बहुतांश पूर्ण झाल्या आहेत. पनवेल तालुका हे भाताचे कोठार समजले जात होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असे; परंतु औद्योगिकीकरण व शहरीकरण पनवेलच्या ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असल्याने या ठिकाणचे शेती क्षेत्र कमी झाले आहे. तळोजासारखी औद्योगिक वसाहत, पनवेलच्या पूर्व भागात आलेले मोठमोठे गृहप्रकल्प व फार्म हाऊस संस्कृतीमुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे.

132 हेक्टर क्षेत्रावर फळ, भाजीपाला
पनवेल तालुक्यात 6,201.53 हेक्टरवर शेती केली जाते. यामध्ये यंदा 6,021.28 हेक्टरवर भातपेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यंदा 132.58 हेक्टरवर फळ व भाजीपाला लागवड केली गेली आहे. 61.28 हेक्टर क्षेत्रावर नागली पीक घेतले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भातपिकाचे क्षेत्र कमी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद गीते यांनी दिली.
Exit mobile version