| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. नद्या, तलाव आणि विहिरींमधील तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामपंचायतींना आतापासूनच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. तालुक्यात यंदा सुमारे 2380 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दरवर्षी संरासरी साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळेही पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे, भातशेतीतील दाण्यांच्या वाढीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी भात कापणी झाली तर काही ठिकाणी उभी पिके करपून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांना जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोटारी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत असून, सार्वजनिक नळांमधून पाणी रस्त्यावर वाहून जाते तसेच पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला विद्युत लावल्यामुळे काही घरांना अधिक पाणी मिळते, तर इतर घरांना अपुरा पुरवठा होतो. परिणामी, गावातील सर्व कुटुंबांना पुरेसे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाण्याचा अपव्यय रोखणे, तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.





