शेलू परिसरात कुजलेला मृतदेह

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर शेलू गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला झाडीमध्ये एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. शेलू गावातील देवीच्या मंदिरात यात्रा भरत असते आणि त्या यात्रेसाठी साफसफाई करताना हा मृतदेह स्थानिकांना आढळून आला आहे. नेरळ परिसरात असे अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने घाबरत पसरली आहे.

मृतदेह हा किमान आठवडाभर टाकण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.तो मृतदेह पुरुष जातीचा आहे. संपूर्ण कुजलेल्या स्थितीत आल्याने पोलिसांना देखील त्याबाबत अंदाज येणे कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे त्या मृतदेहाच्या वयाचा अंदाज पोलिसांनी काढला असून साधारण 35 ते 40 वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अज्ञात व्यक्तीच्या अंगावर जीन्स पॅन्ट आणि शर्ट असून मृतदेह खून करून टाकण्यात आला असावा असे पोलीस सांगत आहे.

शेलू हे गाव कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असून त्या ठिकाणी पुढे ठाणे जिल्ह्याची हद्द सुरु होते. त्यामुळे आमच्या भागात मागील वर्षभरातील हा तिसरा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांनी शेलू येथे तात्पुरती पोलीस चौकी सुरु करावी. पूर्वी अशी चौकी सुरु करण्यात आली होती आणि त्यावेळी रात्रीच्या वेवेळी पोलिसांचा बंदोबस्त तेथे असायचा,अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य समीर मसणे यांनी दिली.

Exit mobile version