। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कशेळे गावच्या हद्दीत मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. कर्जत–मुरबाड मार्गालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कशेळे गावाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडलेला दिसून आला. तसेच दुर्गंधी पसरल्याने, ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
प्राथमिक पाहणीमध्ये संबंधित मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान असल्याचे समोर आले आहे. मृतदेहाची अवस्था पाहता या व्यक्तीचा मृत्यू साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती फिरस्ती करणारी आणि भंगार गोळा करणारी किंवा रस्त्यावर राहणारी गरीब व्यक्ती असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघातामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अधिकारी अनिल सोनोने तसेच पोलीस अधिकारी शिंदे, वरते आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे कशेळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून मृताची ओळख पटवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.







