| चिरनेर | प्रतिनिधी |
करमणुकीच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या उरणकरांच्या आशा पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. तब्बल 27 कोटी खर्चाच्या अद्यावत टाऊन हॉलच्या कामाला दहा वर्ष उलटूनही पूर्णत्व आलेलं नाही. आता हे स्वप्न साकार होण्यासाठी नागरिकांना आणखी 20 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उरणमध्ये सध्या नाट्यगृह, सिनेमाहॉल यासारखी कोणतीही करमणुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाटक, चित्रपट किंवा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेलकडे धाव घ्यावी लागत आहे. पूर्वी शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल येथे असलेल्या नाट्यगृहात विविध कार्यक्रम रंगत असत. हजार प्रेक्षक क्षमतेच्या या सभागृहात नाटकांसह विविध सांस्कृतिक उपक्रम होत असत. तसेच लग्न समारंभही कमी खर्चात पार पडत होते. मात्र, इमारत धोकादायक ठरल्याने वापर बंद करण्यात आला. आणि उरणकरांचे एकमेव करमणुकीचे केंद्रच बंद पडले. त्यानंतर नव्या टाऊन हॉलचे स्वप्न दाखवत जुनी इमारत पाडून नवे बांधकाम सुरू करण्यात आले. दशकाभरात नाट्यगृहाच्या कामात सातत्याने अडथळे येत राहिले. तीन वेळा ठेकेदार बदलले. प्रशासकीय कालावधीचा परिणाम झाला. आणि तांत्रिक अडचणीमुळे काम रखडत गेले. परिणामी उरणकरांना करमणुकीसाठी आजही बाहेरच्या शहरांवर अवलंबून राहावे लागत असून, त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च पडत आहे. उरणमधील नाट्यगृहाच्या कामातील तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. 2027 पर्यंत टाऊन हॉलचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
सुमारे 12 हजार चौरस फुटांच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी 20 कोटी बांधकाम आणि पाच कोटी अंतर्गत सजावटीसाठी असा एकूण 27 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. मिनी थिएटर, नाट्यगृह, लग्न समारंभासाठी सभागृह, रेस्टॉरंट आणि इतर सुविधा उभारल्या जाणार आहेत.
निखिल ढोरे
शहर अभियंता उरण नगर परिषद







