वाढत्या जलप्रदुषणाने कोकणात मासेमारीत घट

आ. जयंत पाटील यांचा सभागृहात प्रश्‍न
| मुंबई | दिलीप जाधव |

कोकणातील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी समुद्रात व नद्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे जल प्रदूषणात मोठया प्रमाणात वाढ झाली असून त्याचा फटका मासेमारीला झाला असल्याचा प्रश्‍न शेकापचे आ.जयंत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत उपस्थित केला. रायगड जिल्ह्यात जल प्रदूषणामुळे सन 2016/17 ते 2020/21 या 5 वर्षात सुमारे साडे तीन हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादनात घट झाली आहे, अशी वस्तुस्थिती जयंत पाटील यांनी जोरकसपणे मांडली.

राज्याचे मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांनी त्यास दुजोरा दिला. ते पुढे म्हणाले की सन 2019-20च्या प्रमाणात सन 2020-21 या वर्षात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मच्छीमार बांधवांना सक्षम पद्धतीने मासेमारी न करता आल्याने 3778 मेट्रिक टनांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. मासेमारी व्यवसायातील विविध गटांचे विशेषतः पारंपारिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे व शाश्‍वत मासेमारी व्यवस्थापना द्वारे भविष्यकालीन मत्स्य साठ्याच्या जतना साठी शासन आदेश 5 फेब्रुवारी 2016 व इतर आदेशाद्वारे मासेमारीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, असेही मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

Exit mobile version