समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी

डबल डेकर मालगाड्या धावणे होणार शक्य

| पालघर | प्रतिनिधी |

पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाच्या न्यू सफाळे ते जेएनपीटी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दुतर्फा मालगाड्यांची वाहतूक करून यशस्वी चाचणी पूर्ण झाली. यामुळे या मार्गिके वरून डबल डेकर मालगाड्या धावणे शक्य होणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वेच्या वसई ते डहाणू दरम्यानच्या उपनगरीय मार्गिकेवरील भार हलका होणार असून या मार्गावर नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाची जेएनपीटीपर्यंतची जोडणी पूर्ण झाली असून, या मार्गावरून जेएनपीटी न्यू सफाळे विभागात पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी 31 मार्च रोजी यशस्वीपणे पार पडली. यामुळे आता उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील जेएनपीटी दरम्यान अखंड मालवाहू रेल्वेगाडी चालवण्याचा मार्ग
खुला झाला.

या यशस्वी चाचणीनंतर जेएनपीटी ते थेट दादरी दरम्यान मालवाहतूक सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. 30 मार्च रोजी दुपारी 1.58 वाजता 60133 क्रमांकाचे इंजीन जेएनपीटीतील नव्या डीएफसी या यार्डातून रवाना झाले. हे इंजीन सायंकाळी 7.20 वाजता न्यू सफाळे स्थानकात दाखल झाले. 102 किमीचे अंतर इंजिनने पाच तास 22 मिनिटांत पार केले. चाचणी यशस्वी झाल्याने नवा दुहेरी मालवाहतुकीचा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. नव्या रुळांच्या क्षमतेच्या तपासणीसाठी दोन्ही दिशेने कंटेनर जोडलेल्या मालगाड्या चालविण्यात आल्या. जेएनपीटी ते न्यू सफाळे दरम्यान इलेक्ट्रिक इंजीन आणि न्यू सफाळे ते जेएनपीटी दरम्यान डिझेल इंजिनची मालगाडी धावली. एकाच वेळी दोन्ही दिशेने मालगाड्या धावत्या करून संपूर्ण विभागाची तपासणी करून देण्यात आली आहे.

Exit mobile version