। माणगाव । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई या संस्थेने उभारलेल्या रातवड येथील तालुक्यातील पहिल्याच वीरगळ स्मारकाचा लोकार्पण सोहळा माजी सैनिक गोपीचंद उतेकर यांच्या शुभहस्ते आणि इतिहास अभ्यासक सुखद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्राचीन कालखंडातील वीरांच्या दुर्मिळ प्रकारातील वीरगळ जतन करण्याच्या हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेने रातवडची ग्रामदेवता रातुआईच्या मंदिराशेजारी आणि मुंबई-गोवा महामार्गालगत हे भव्य स्मारक उभारले आहे. यात पाच वीरगळांचा समूह असून त्यांना रासायनिक प्रक्रियेतून संवर्धन केले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेने स्वखर्चाने वीरगळ स्मारक बांधले असून रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिवभक्त आणि वीरगळ संशोधकांसाठी आकर्षण ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी इतिहास अभ्यासक सुखद राणे यांनी उपस्थितांना आपला अलौकिक वारसा जतन करण्यासाठी आवाहन केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे रायगड जिल्हाप्रमुख रामजी कदम यांनी वीरगळांबद्दल सविस्तर माहिती आणि स्मारकाचे प्रयोजन मनोगतातून व्यक्त केले. तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी संस्थेच्या गडसंवर्धन कार्याबद्दल माहिती सांगितली. वीरगळ स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रातवड उपसरपंच सतीश पवार, निवृत्त पोलीस अधिकारी सुदेश पालकर, रातुआई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विलास पालकर, माजी उपसरपंच शरद पालकर, ग्रामपंचायत सदस्या सीमा आईत दुर्गवीर प्रतिष्ठानचे सचिव सागर टक्के, उपाध्यक्ष रविंद्र रावराणे, महेशस्वामी जंगम, आम्ही सह्याद्रीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल करकरे तसेच रातवड ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होते.