राज ठाकरेंच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

। खेड। प्रतिनिधी ।
खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून खेड, दापोली वासियांना रूग्णसेवेसाठी दोन कार्डियाक रूग्णवाहिका येणार असून त्यांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे वैभव खेडेकर यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपली असून आजही ते जनहितासाठी तत्पर असतात. जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी खेड, दापोली वासियांच्या सेवेत तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिका अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा त्यांनी पूर्ण केली असून या दोन्ही रुग्णवाहिकेचे नियोजन व सेवा सुविधा पुरविण्याचे काम खेड सामाजिक कार्यकर्ते बुरान टांके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्यांस उपस्थित आमदार नितीन सरदेसाई, अनिल खानविलकर, स्नेहल जाधव, भूषण चिखले, नंदु साळवी, सचिन गायकवाड, ऋषिकेश कानडे आदी पदाधिकारी आणि अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Exit mobile version