। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील खेळाडू दीप रांभिया व अक्षया वारंग यांनी भारतातील मिश्र दुहेरीतील क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
दीप रांभिया आणि अक्षया वारंग यांनी नुकत्याच झालेल्या बंगलोर येथील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच, या जोडीने देहरादून, उत्तराखंड येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली होती. दीप आणि अक्षया ही जोडी गेली तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या दोघांना त्यांच्या कामगिरीचे फळ अव्वल क्रमवारीच्या रूपात मिळाले आहे. दीप रांभिया-अक्षया वारंग ही जोडी ठाण्याच्या इतर खेळाडूंसमवेत खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे नियमित सराव करीत आहे. आपल्या या यशात ठाणे बॅडमिंटन अकादमीचे मोठे योगदान आहे, असे या दोन्ही खेळाडूंनी नमूद केले आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची मानकरी दीप रांभिया याची गतवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यंदा अक्षया वारंग हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावणारी अक्षया ही ठाणे महापालिका अकादमीची 14वी खेळाडू ठरली आहे.